Vrundavan Holiday Home

It is in the field of Providing Lodging Services to Visitors since last 25 Years.

!! श्री मोरयादेव !!

पुळ्याच्या गणपती महाद्वारातून आपण बाहेर पडलो की, प्रदक्षिणापथावर थोड्याच अंतरावर दोन दीपमाळा (त्रिपूर) आणि त्यामध्ये एक टूमदार घुमटी आणि त्यात एक देवाची स्थापना केलेली दिसून येते.  या देवालाच मोरया असे म्ह्टले जाते.. या देवाची इथे कशी स्थापना झाली याविषयीची कथा अशी की, गणपतीपुळ्याजवळील मालगुंड येथील भंडारी समाजातील एक माणसाचे एक प्रवासी गलबत होते. निरनिराळ्या बंदरातून ते माणसांची वाहतूक करीत असे, असेच ते जहाज एकदा प्रवासी वाहतूक करीत असता, तिवरी  या बंदरात येत असता मोठ्या वादळात सापडले, वादळाचे ते भयंकर तांडव बघून  गलबतातील प्रवासी भयभीत झाले.  वादळामुळे बंदरही दिसेनासे झाले. प्रचंड लाटांचे तांडव सुरू झाले आणि गलबत बुडणार असे दिसू लागले.  त्यावेळी गलबताचे मालकाने सांगितले की, या संकटातून पार होण्यासाठी कोणी देवाची प्रार्थना करील तर बरे होईल.  त्यावेळी गलबतावर बापट या आडनावाचे कोणी गृहस्थ होते.  त्यांनी सर्व प्रवासी लोकांसह श्रीगजाननाचा धावा सुरू केला. त्यांची ही करूणेने भरलेली प्रार्थना जणू गजाननाने ऎकली आणि एकदम चमत्कार घडून आला.  आपण कुठे जात आहोत य कांही कळायच्या आतच गलबत सुखरूपपणे आता जिथे मोरयाचे स्थान आहे त्याचे पुळणीत येऊन थांबले.  या प्रालयकारी संकटातून सुटल्यामुळे सर्वांना आनंद झाला.  नंतर त्या बापटांच्या सांगण्यावरून गलबताच्या त्या भंडारी मालकाने तेथे दोन दीपमाळा आणि त्यामध्ये या मोरया देवाची स्थापना केली.  तेंव्हापासून दरसाल त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव करण्यासाठी आणि मोरया देवाच्या पूजे अर्चेसाठी मालगुंड येथील कांही जमीन या कार्यासाठी त्याने दिली. सदरची व्यवस्था अजूनही कै. सदाशिव विनायक बापट यांचे वंशज यांच्या तर्फे चालू आहे.

पुळ्याचे क्षेत्रोपाध्ये बापट.

शिवाजी महाराजांनी जेंव्हा या तीर्थस्थानाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी केवळे मंदिराचा जिर्णोध्दारच केला नाही, तर तेथील पूजा पाठाविषयी व्यवस्था करून दिली.  त्यावेळी त्याकाळाचे समकालीन बापट घराण्यातील वेदमूर्ती श्रीधरभट बापट यांस श्रीगणपती देवस्थानाचे क्षेत्रेपाध्ये म्हणून पुजाअर्चेसाठी शेतजमीन, घरठाण जमीन, नारळीची बाग वैगरे मिळकत महाराजांकडून इनाम मिळाली.  यावेळेपासून  क्षेत्रोपाध्ये म्हणून हे अधिकार आजपर्यंत बापट घराण्याकडे वंशपरंपरेने चालू आहेत.  महाराजांनंतर त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांकरवी क्षेत्रोपाध्ये वृत्तीची वर्षासन पत्रे पुन्हा करून दिली.  वेदमुर्ती महादेव श्रीधरभट बापट हे क्षेत्रोपाध्ये झाल्यावर श्रींची पूजाअर्चा करण्यासाठी ते मालगुंड गावातून गणपतीपुळे येथील मंदिरात येत असत. एक दिवस पूजा सामग्रीने भरलेले तबक घेऊन येत असता, त्यांच्या पूजेच्या तबकात नारळी माडापासून काढल्या जाणा-या माडी या मादक द्रव्याचा थेंब पडला, ही घटना घडण्यासा कारण असे होते की, देवस्थानाकडे जाणा-या मार्गावर रामा भंडारी या गृहस्थाची नारळी माडाची बाग होती.  त्या बागेतील झाडापासून तो माडी काढण्याचा उद्योग करीत असे. माडीसाठी माडाच्या पोईला अडकविलेले मडके सकाळ आणी संध्याकाळ या दोन वेळेला काढून त्यातील माडी ओतून घेतली जाते.  एका सकाळी अशी मडक्यातील माडी ओतून घेताना, त्या माडाखालून जाण्या-या बापट भडजींच्या पूजेच्या तबकात त्यातील कांही थेंब पडले.  त्यामुळे क्षेत्रोपाध्ये बापट संतप्त होवून तेथेच ठाण मांडून बसले आणि या बागेतील हा माडी काढण्याचा व्यवसाय बंद झाल्याशिवाय मी परत पूजेचे दुसते तबक आणावयास परत जाणार नाही, असा त्यांनी निश्चयी हटट धरला.  अखेर महाराजांनी श्रीपूजेत आलेले विघ्न दूर करण्यासाठी ती बाग रामा भंडा-यांकडून काढून घेउन क्षेत्रोपाध्ये बापट यांच्या वतनात सामील केल्याचा हुकुमनामाही दिला.  

तेव्हांपासुन आजतागायत श्रीदेव गणपतीची दैनंदिन सेवा, पुजा-अर्चा व वर्षभरातील धार्मिक कृत्ये, त्याच प्रमाणे मंदिरात येणा-या भक्तांची पुजा अभिषेकसेवा आदि धार्मिक कृत्ये क्षेत्रोपाध्ये या नात्याने वंशपरंपरेने बापट कुटुंबिय पार पाडीत आहेत. (या आधार म्हणून सन १७३८ शके १६५५ फाल्गुन शु. ०१ च्या क्षेत्रोपाध्ये बापट यांच्या वतनाचे सनदेतील कागदपत्रात पहावयास मिळतो.)

L

BEAUTIFUL BEACH OF GANPATIPULE