श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे होणारी धार्मिक कार्य आणि उत्सव

  1. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते अक्षयतृतीयेपर्यंत रोज सायंकाळी वसंतपूजा केली जाते.  या उत्सवात देवाची महापुजा, आरती, मंत्रपुष्प, प्रसाद व दक्षिणा असा कार्यक्रम.
  2. आश्विन शुद्ध पौर्णिमा (त्रिपुरी) पर्यंत रोज सायंकाळी श्रींची महापुजा केली जाते.  देवस्थानचे आवारात असलेल्या दीपमाळेवर दिवे लावले जावून दीपोत्सव केला जातो.  त्याप्रमाणे आरती, मंत्रपुष्प, प्रसाद व दक्षिणा इत्यादी विधी केले जातात.
  3. भाद्रपद आणि माघ महिन्यातील चतुर्थि उत्सवात आणि प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थिला श्रींची पालखी यात्रा निघते.  श्रींची रूप्याची उत्सवमुर्ती करून पालखीत बसविली जाते, आणि प्रदक्षिणा पथाने  मिरवणूक निघून समुद्राकाठाने  श्रींच्या मंदिरात परत येते.  या एक मैल लांबीच्या प्रदक्षिणेत चारही दिशांना असलेल्या द्वारदेवतांपुढे पालखी थांबवून आरती, मंत्रपुष्प होते आणि प्रसाद वाटला जातो.  पालखी मंदिरात मूळस्थानी आल्यावर मोठ्या स्वरूपात परत आरती मंत्रपुष्प म्ह्टले जाते आणि सर्व भक्तजनाचे कल्याण व्हावे अशी सामुदायिक प्रार्थना केली जाते.

स्वत: गणराज सर्वकाळ गणपतीपुळे येथे वास्तव करून असल्यामुळे गणपतीपुळे गावात कुणीही गणेशचतुर्थिला गणेशाची पार्थिव मूर्ती घरी बसवून उत्सव करीत नाहीत. हे एक येथील वैशिष्ठ आहे

भाद्रपद उत्सव : भाद्रपद शु. १ ते भाद्रपद शु. ५
दररोज रात्री आरत्या, मंत्रपुष्प कीर्तन असा कार्यक्रम असतो.

माघ उत्सव : माघ शु.१ ते माघ शु. ५
दररोज रात्री आरत्या, मंत्रपुष्प कीर्तन असा कार्यक्रम असतो.
 
दिपोत्सव : कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा (अश्विन शु. १५ ते कार्तिक शु. १५)
दररोज सायंकाळी आरतीच्या वेळी पणत्या लावून दिपोत्सव साजरा केला जातो.

वसंत पूजा: चैत्र शु. १ ते वैशाख शु.३ (गुढीपाडवा ते अक्षयतृतीया)

श्रींची पालखी मिरवणूक: वर्षातून १७ वेळा निघते.
प्रत्येक संकष्टीला एकदा, अशी वर्षातून १२ वेळा व पुढील प्रत्येक दिवशी
चैत्र शु. १ (गुढीपाडवा), दसरा (विजयादशमी), दिपावली (पहिला दिवस)
भाद्रपद शु. ४ (गणेश चतुर्थी), माघ शु. ४ (माघी चतुर्थी)