श्री स्वयंभु गणपतीविषयीची माहिती

सुमारे ४०० वर्षापूर्वी गावचे खोत श्री भिडे यांचे वरती मुस्लीम आमदनीत धर्मांतराचे संकट आले. त्यावेळी त्यांनी देवाची आराधना करण्यास सुरूवात केली व आपल्यावरील संकट निवारण्यासाठी देवाचा धावा सुरू केला. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दृष्टांत दिला की तुझ्यावरील संकट टळले असुन सर्व भक्तांच्या कल्याणासाठी सागरतिरी केतकीच्या बनामध्ये मी प्रकट झालो आहे. या दृष्टांताच्या नुसार भिडे यांनी केतकीच्या बनामध्ये श्रीगणेसाच्या मुर्तीचा शोध घेतला त्यावेळी त्यांना श्रीगणेशाचे छाती, पोट, नाभी व तळाला दंत असे निर्गुण निराकार स्वरूप पहावयास मिळाले, त्यानंतर श्री भिडे यांनी श्रीगणेशाची सेवा सुरू केली व वरती गवती छ्प्पर बांधले व संपूर्ण टॆकडी म्हणजेच गणपती स्वरूप मानले. कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रींचा गाभारा व पेशव्यांनी बाहेरील मंदिर बांधले, सदर मंदिराचा जिर्णोध्दार सन २००३ साली संस्थान श्रीदेव गणपतीपुळे तर्फे करून श्रीदेव गणपतीचे नुतन मंदिर उभारण्यात आले. आपल्या भारताच्या आठ दिशेला आठ स्वयंभू गणपतीची स्थाने आहेत, त्यापैकी पश्चिम दिशेचे स्थान म्हणजेच गणपतीपुळे येथील श्री लंबोदर विनायक.